---Advertisement---

जनावरांसाठी अन्नछत्र मंडळातर्फे मंगळवारी लंपी लसीकरण शिबिर,अन्नछत्र मंडळाची सामाजिक बांधिलकी

On: September 25, 2022 10:21 PM
Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट ,दि.२५ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार ( दि. २७ सप्टेंबर ) रोजी सकाळी १० वाजता न्यासाच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना,राजे फत्तेसिंह क्रीडांगण शेजारी, स्टेशन रोड येथे तालुक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती मंडळाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत संकट काळात मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सध्या देशात व राज्यात गेल्या एक महिन्यापासून गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोग झपाट्याने पसरत आहे.

लम्पी हा रोग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील पशुधन व शेतकऱ्यांचे रोजगार वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम न्यासाने हाती घेतले आहे.सोलापूर जिल्यात सदर रोगाची लागण ही माळशिरस, सांगोला, माढा या तालुक्यातील जनावरांना झाली आहे. सदरच्या तालुक्याची परिस्थिती लक्षात घेऊन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पशु-पालक शेतकऱ्यांच्या हितार्थ सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शामराव मोरे यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात जनावरांचा धोका टाळण्यासाठी व लम्पीला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंध शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी देखील न्यासाने राज्य, राष्ट्र यावर नैसर्गिक संकट आले त्याकाळात मदती करिता पुढाकार घेतले आहे. गेली ३५ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे.

यापूर्वी कोरोनाचे पार्श्वभूमीवर दोन्ही लॉकडाऊन कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत ह्या न्यासाने शहर व ग्रामीण भागात अन्नदान सेवा सलग ७ ते ८ महिने केली आहे. कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णास सलग ५ ते ६ महिने दैनंदिन नाष्टा, चहा व जेवण पुरवठा केले आहे. तसेच शहरात सॅनिटायजर फवारणी करणे मोफत मास्क वाटप आदी उल्लेखनीय कार्य केले आहे. न्यास गरीब व गरजवंताना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करीत असते. त्याचप्रमाणे जळीतग्रस्त, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना तातडीचा मदतीचा हात देते.

१९९३ च्या किल्लारी येथील महाविनाशकारी भूकंपाचे वेळेस महिनाभर दररोज ट्रकभरून अन्न भूकंपग्रस्तांना पाठविण्यात आले. याबरोबरच २०१४ ला अक्कलकोट ग्रामीण भागातील खानापूर, तडवळ या भागातील पूरग्रस्तांना ८ दिवस मदत पुरविण्यात आली. २०१९ ला सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना व २०२१ च्या पूर परिस्थितीत चिपळूण येथील पूरग्रस्तांना ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य व अन्नधान्य शिधा पाठविण्यात आला.

अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोकांसाठी समर्थ महाप्रसाद सेवेच्या माध्यमातून दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्यत येत आहे. हे न्यास सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, आरोग्य, पर्यावरणपुरक, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, आपत्कालीन व्यवस्थापन आदी उपक्रम सदैव राबवित असते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!