सोलापूर : प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी (पटेल वस्ती) येथील जिल्हा परिषद शाळेमधील २० विद्यार्थ्यांनी काजू समजून एरंडाच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याने शाळेचे शिक्षक धनसिंग चव्हाण व पालकांनी १४ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर सहा विद्यार्थी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खुपसंगी येथे केंद्रस्तरीय स्पर्धेच्या तयारीसाठी हे विद्यार्थी आले होते. सकाळच्या सत्रात या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कंपाऊंडच्या पलीकडील रिकाम्या जागेमध्ये उगवलेल्या एरंडाच्या झाडाच्या बिया काजू समजून खाल्ल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे प्रथम दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ६ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. तर १४ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणेश वाले (वय १०), संस्कृती बंडगर (वय ९), प्रणव सावंत (वय १०), किरण वाले (वय १०), आराध्या वाले (वय ७), श्रेया वाले (वय ९), राजकुमार तांबे (वय ८), आयान पटेल (वय १०), सिद्धार्थ तांबे (वय १०), सोया इनामदार (वय ९), प्रेम लवटे (वय ९), पवन लवटे (वय १०), गौरी वाले (वय ९), ओम हाके (वय १०) या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने ओपीडी विभागातील ३५ नंबरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.