राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार, २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर
मुंबई : राज्याच्या पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये ६७४० पदे रिक्त आहेत. तर पूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या ५ हजार ४६८ इतकी आहे.
राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याची बैठक घेतली. आता या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. पोलिस भरतीची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
पोलिस भरती प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जिल्हानिहाय जाहिराती १ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. याबाबतच्या सूचना पोलिस महासंचालकांना राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिल्या आहेत. ३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पोलिस भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील. पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवाराला एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करु शकत नाही. तसंच उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते.
• कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720,पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98,लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154 एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
• अनुसूचित जाती – 181 • अनुसूचित जमाती – 1350 • विमुक्त जाती (अ) – 426 • भटक्या जमाती (ब) – 374 • भटक्या जमाती (क) -473 • भटक्या जमाती (ड) – 292 • विमुक्त मागास प्रवर्ग – 292 • इतर मागास वर्ग – 2926 • इडब्लूएस – 1544 • खुला – 5468 जागा • एकूण – 14956