सोलापूर (प्रतिनिधी) : शहर आणि ग्रामीण वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीला शहर आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे , दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, अप्पर तहसीलदार मंद्रूप राजशेखर लिंबारे , तालुका आरोग्य अधिकारी प्रतिनिधी राजू राठोड आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटत सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात अनेक रुग्ण सापडले होते. यामुळे अनेक रुग्ण ही दगावले आहेत. दुसऱ्या लाटेत शहर आणि ग्रामीण भागात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली होती. यावेळी मात्र गाफील न राहता प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना यावेळी आ. देशमुख यांनी दिल्या. प्रशासनाला काही सहकार्य हवे असल्यास आपण सहकार्य करू, अशी ग्वाही आ. देशमुख यांनी यावेळी दिली.
यावेळी आरोग्य अधिकारी लोहारे आणि तहसीलदार कुंभार यांनी कोरोनाची सध्या स्थिती आणि नियोजनाची माहिती आ. देशमुख यांना दिली. प्रशासन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याच्या सूचना
सध्या कोरोना बरोबरच ओमीक्रॉन नावाचा विषाणू आला आहे. हा जास्त घातक नसल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत प्रशासनाने नागरिकांमध्ये जागरूकता करून जास्तीत जास्त नागरिकांचे आणि युवकांचे लसीकरण करावे, अशा सूचना आ. देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.