सुप्रीम कोर्टाने फेटाळली नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका; आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी दिली १० दिवसांची मुदत
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष संतोष परब यांच्यावरील जिवघेणा हल्ल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे.
नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.
याबरोबरच सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांनी दिलासाही दिला आहे. कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण झाल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात.
नितेश राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी कोर्टात उपस्थित होते. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं असल्याचा दावा यावेळी मुकुल रोहतगी यांनी केला. तसंच पेपर कटरने जीवे मारण्याचा उल्लेख झाला असून हे शक्य आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. अभिषेक मनू सिंघवी यांनीदेखील कोर्टात युक्तिवाद करताना नितेश राणे यांच्यावर आतापर्यंत असलेले गुन्हे फक्त राजकीय नसून इतरही आहेत असं सांगितलं. पैशांची देवाणघेवाण, षडयंत्र याचा तपास होणं गरजेचं आहे यामुळे जामीन मिळू नये असा युक्तिवाद त्यांनी केला.