अक्कलकोट, दि.१४ : केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत होणारा सुरत ते चेन्नई हा नवा राष्ट्रीय महामार्ग अक्कलकोट मार्गे जाणार आहे.त्यामुळे अक्कलकोटला आणखीन एका नव्या रस्त्याची भर पडणार असून यामुळे दळणवळणाची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.हा रस्ता एकूण १२७१ किलोमीटरचा असून सध्या सुरतहुन सोलापूर, मुंबई,पुणे मार्गे यावे लागते.आता मात्र
सुरत ते चेन्नई या नव्या ग्रीनफिल्ड मार्गामुळे अखंड मार्ग होणार आहे.हा मार्ग सुरत, नाशिक, अहमदनगर, करमाळा, बार्शी ,सोलापूर ,अक्कलकोट कलबुर्गी, महबूबनगर, कर्नूल,तिरुपती,चेन्नई असा राहणार आहे.हा महामार्ग साकार करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या रस्त्याच्या सीमा निश्चित केल्या जातील,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हा मेगा हायवे असल्याने वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात राहणार आहे.अक्कलकोटला आता सध्या चोहोबाजूने चांगले रस्ते झाले आहेत.त्यात या नव्या रस्त्याची भर पडणार आहे.
या नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित अंतरामध्ये सोलापूर ते सुरतमधील ९५ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे,अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
या कमी झालेल्या अंतरामुळे दीड तासाची वेळेची बचत होईल, असे देखील त्यांनी त्यात म्हटले आहे.या मार्गाच्या डीपीआरचे काम लवकरच पूर्ण होणार असून ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया चालू होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,असे सांगण्यात येत आहे. या नव्या रस्त्यामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर मात्र दोन राज्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या नकाशावर येणार आहे.त्यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
५४ हजार कोटी
खर्च होणार
या रस्त्याचे काम मोठे असल्याने केंद्र सरकारकडून या रस्त्यावर ५४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.