शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे; कुरनूर येथील शेतकरी मेळाव्यात आयएएस ज्ञानेश्वर पाटील यांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.११ : आज कालच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे तरच शेती फायद्याची ठरू शकते,असे मत मध्यप्रदेशच्या वित्त व लेख विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.
कुरनूर (ता.अक्कलकोट ) येथे ज्ञानसागर
कृषी केंद्राच्यावतीने कुरनूर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे होते.पुढे बोलताना पाटील म्हणाले कि,या पुढच्या काळात कुरनूरमध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील चांगल्या पद्धतीचा माल उत्पादित करावा तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादनात वाढ करावी.ज्ञानसागर संस्थेच्या मार्फत वारंवार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातील.हे केंद्र एक ‘बिझनेस मॉडेल’ ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजक तथा संस्थेचे चेअरमन अमर पाटील यांनी प्रास्ताविकात हे केंद्र तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी उभा न करता गाव पातळीवर का उभे केले यामागची भूमिका स्पष्ट केली आणि याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना मोरे म्हणाले की,या केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.पुढील काळात कुरनूर गाव बाजारपेठेचे
केंद्र बनावे.त्या दृष्टिकोनातून गावातील उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.त्याला आमचे निश्चितच सहकार्य असेल,अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भ्रमणध्वनीवरून मेळाव्याला शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य विपणन प्रबंधक सयाजी पाटील,एम.एस पवार,मार्केटिंग अधिकारी वशिष्ठ घुले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.व्यासपीठावर नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,मनीषा ॲग्रोचे कार्यकारी संचालक उमेश पाटील,बसवराज बाणेगाव,दिलीप काजळे, विवेकानंद चव्हाण, संजय मोरे, अभिजीत चुंगे,सुरेश गद्दी,रुक्मिणी पाटील,मुन्ना कस्तुरकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण मोरे,राजू बिराजदार,रफिक तांबोळी, पांडुरंग बंडगर, गोरख सुरवसे,मनोज बंडगर रामा शिंगटे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराव सुरवसे यांनी केले तर आभार दिगंबर जगताप यांनी मानले.