ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धोत्रीत २१ मे रोजी गोकुळ शुगर तर्फे शेतकरी स्नेहमेळावा व कृषी प्रदर्शन; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे येणार

अक्कलकोट, दि.१६: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे येत्या
२१ मे रोजी गाळप हंगाम सांगता समारंभ
व भव्य शेतकरी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यानिमित्त दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर, तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल,असेही त्यांनी सांगितले.

 

शनिवार दि.२१ मे रोजी सकाळी ९ :३० वाजता
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर या सर्व कार्यक्रमास आमदार संजयमामा शिंदे, माजी मंत्री मधुकरराव माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील,लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील ,तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा गाळप हंगाम यशस्वी होण्यामागे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारणीभूत आहेत.त्यांच्यामुळे या हंगामात विक्रमी गाळप करत आले.यामध्ये शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेला विश्वास विसरता येणार नाही.या ऋणातून मुक्त होणे कधीच शक्य नाही,असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्याने दहा हार्वेस्टर मशीन खरेदी केले आहेत. त्यामुळे पुढच्या हंगामात एकूण गाळपाच्या २० टक्के ऊस हा या मशीन मार्फतच येणार आहे.या मेळाव्यास शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले.या पत्रकार परिषदेस गोकुळ शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,अभिजित गुंड उपस्थित होते.

७ लाख ७१ हजार मेट्रिक
टन उसाचे गाळप

सन २०२१ -२२ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळेत दिले देऊन तब्बल ७ लाख ७१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा स्नेहमेळावा होणार
आहे.

दत्ता शिंदे, चेअरमन गोकुळ शुगर (धोत्री)

 

शेतकऱ्यांना कृषी
प्रदर्शनाचा फायदा

या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाविषयी माहिती, अवजारांची ओळख आणि माहिती, विविध कंपन्यांची कृषी अवजारे आणि शेतीसाठी आवश्यक सामग्रीचा प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. जवळपास तीस स्टॉल मांडण्यात येणार आहेत. यात ऊस तोडणी यंत्र, ट्रॅक्टर, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासह रासायनिक आणि सेंद्रिय खते विक्री सेवा देणाऱ्या कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!