अक्कलकोट,दि.५ : तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड वाढत चालली आहे. असे असले तरी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असताना दुधनी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सौदा बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ७०० रूपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सोयाबीनला यंदाच्या हंगामातील अधिक दर मिळाला आहे. सोयाबीनच्या आद्रतेवर(हवा पाहून) दर अवलंबून असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच दुधनी मार्केट कमिटीत उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी, सुर्यफुलासह इतर खरीप पिकांच्या हमीभावापेक्षा जास्तीचा दर मिळत असल्याने सोलापूर सह शेजारच्या जिल्ह्यांतील व कर्नाटक राज्यातील विविध भागातुन शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत आहे.
दुधनीच्या सौदा बाजारात सद्यस्थितीत उडदाला प्रति क्विंटलला ७ हजार ६४० रुपये,मुगाला ७ हजार रूपये, तुरीला ७ हजार २८०रूपये, ज्वारी ३ हजार ६९०, सुर्यफुलाला ६ हजार ६०० रूपये इतका भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.शेतीमाल विक्री करताना काही अडचणी आल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीस संपर्क साधावे, असे आवाहन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले आहेत.
यावेळी सचिव एस.एस.स्वामी, शशिकांत सावळसुर, गुरुशांत हौशेट्टी, हणमंत गुड्डोडगी, शाणप्पा संगोळगी, रमेश ढंगे, गुरुप्रसाद परमशेट्टी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.