पुणे : ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा सुरेखा कटारिया व डॉ.सुनिता बोरा, सौ.कल्पना कर्नावट, साधना सावणे या पदाधिकाऱ्यांनी केली. जानेवारी २०२३ मध्ये एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार माने यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त राजा माने लिहिलेल्या आणि दत्ता थोरे व संतोष पवार यांच्या प्रगती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” पुस्तकाबद्दल हा पुरस्कार माने यांना दिला जाणार आहे.महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेल्या विविध क्षेत्रातील ७५ मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्या पैलूंवर राजा माने यांनी लेखन केले आहे. या पुस्तकासाठी ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेली रेखाचित्रे ही विशेष आकर्षण आणि चर्चेची ठरली आहेत.
पुस्तकासाठी राजर्षी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रस्तावना तर माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय .पाटील यांनी मलपृष्ठ मनोगत लिहिले आहे.