---Advertisement---

‘लाडकी बहीण’ योजनेचा दुहेरी हप्ताचे पैसे ‘या’ महिन्यात मिळणार !

By team
On: March 15, 2026 11:15 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता राज्य सरकारकडून एकाचवेळी देण्याचे संकेत मिळाले असून हा निधी एप्रिल महिन्यात १५ तारखेपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी ई-केवायसी न केलेल्या महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद केली असून योजना पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तो जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता नव्या आर्थिक वर्षात सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, अथवा १५ एप्रिलपूर्वी हा निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. यासाठी पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काहींच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी राहिल्याने त्यांचा लाभ थांबवण्यात आला होता.

आता सरकारने या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अंतिम संधी दिली असून लाभार्थी महिलांनी ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलांचा या योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!