ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार, तुमच्या खिशावरही होऊ शकतो थेट परिणाम

दिल्ली : २०२२ हे वर्ष लवकरच संपणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो. त्याचबरोबर येत्या वर्षभरात तुम्हाला काही नवीन बदलांनाही सामोरे जावे लागू शकते. हे बदल क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजी किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित असू शकतात.

बँक लॉकरसंबंधित रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाईल. यात बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असेल. आता ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठीही नवीन नियम लागू होतील. क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळवलेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित हे नियम आहेत नवीन वर्षात एचडीएफसी बँक तिच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स बदलणार आहे. क्रेडिट कार्डमधील उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी भरुन टाका.

पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या दरात बदल

डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचे मूल्यांकन करतील आणि नवीन किमती १ जानेवारी २०२३ पासून लागू होतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसोबतच एलपीजीच्या घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही बदल केला जाऊ शकतो.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीशिवाय घरांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल होऊ शकतो. राष्ट्रीय राजधानी आणि आसपासच्या नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद या भागात अलीकडच्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

वाहनांच्या किमतीत वाढ

जर तुम्ही नवीन वर्षात वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर २०२३ मध्ये वाहने महाग होऊ शकतात. एमजी मोटर्स, मारुती सुझूकी, ह्यूंदाई मोटर्स , होंडा, टाटा मोटर्स, रेनाॅ, आँडी आणि मर्सिडिज बेन्झ सारख्या अनेक आघाडीच्या कंपन्यांनी किमतीत वाढ जाहीर केली आहे. टाटा मोटर्सने २ जानेवारी २०२३ पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे म्हटले आहे. होंडा कंपनीच्या किंमती ३० हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात.

ई-इनव्हॉइसिंगशी संबंधित जीएसटी नियमात बदल

येत्या वर्षभरात जीएसटी ई-इनव्हॉइसिंग आणि इलेक्ट्रॉनिक बिलाशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. जीएसटी ई-इनव्हॉईसिंगसाठी थ्रेशोल्ड २० कोटींवरून ५ कोटी रुपये करण्यात आला आहे. नियमांमधील हे बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!