ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे मुंबईतील चार मजले सक्तवसुली संचालनालयाने केले जप्त

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीनं सील केली आहे. सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजल्यांचा समावेश आहे. हे चारही मजले पटेल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत. सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वत: ही माहिती दिली आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची १२ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीनं सीजे हाऊस बिल्डिंग बांधली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहेत. याच प्रकरणात डीएचएफएलचे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहे, तर धीरज वाधवान जामिनावर आहे.

कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत. हे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत. इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा आणि मुलं आसिफ आणि जुनैद यांना या प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावण्यात आलं होतं, परंतु ते हजर होऊ शकले नाहीत. ईडीनं या प्रकरणात इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाची विदेशातील मालमत्ताही जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!