कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार उद्या अक्कलकोट दौऱ्यावर ; ‘या’विषयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता
अक्कलकोट, दि.११ : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथील ए-वन चौक
येथील टेनिस कोर्ट मैदानावर सायंकाळी ६ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली आहे.या मेळाव्याला पालकमंत्री दत्तात्रय भरणे,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी शरद लाड,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम यांच्यासह पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत असगावकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे पहिल्यांदाच अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.त्यामुळे या मेळाव्याची जंगी तयारी अक्कलकोटमध्ये सुरू
आहे.यापूर्वी अनेकवेळा तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी अक्कलकोटच्या अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांच्याकडे मांडले होते.त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक विषयात लक्ष देखील घातले आहे.याच पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.यामध्ये एकरुख सिंचन योजनेला निधी मिळणे, अक्कलकोट स्वामी समर्थ कारखाना सुरू करणे, अक्कलकोट नवीन एसटी स्टँडचे काम त्वरित सुरू करणे,तीर्थक्षेत्र विकास निधी याशिवाय अन्य मुद्द्यांबाबत या दौऱ्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.स्वतः पवार हे अक्कलकोट दौऱ्यावर येत असल्याने हे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आगामी निवडणुकांच्या बाबतीतही रणनीती होण्याची शक्यता आहे.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादीच्या बांधणीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता
आहे.