खासगी ट्रॅव्हल्समधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये;आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते धनादेश वितरण
अक्कलकोट,दि.२९ : फेब्रुवारी २०२३
मध्ये झालेल्या खासगी ट्रॅव्हल्स अपघातात मरण पावलेल्या तालुक्यातील तीन व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयेचा धनादेश आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांची प्रमुख उपस्थिती होती.
१ फेब्रुवारी २०२३ रोजी दौंड येथे झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तीन व्यक्ती मयत झालेल्या होत्या.या अपघातामध्ये तालुक्यातील आरती अंबणा बिराजदार (चपळगांव), गणपती मल्लाप्पा पाटील (सलगर), अमर महांतेश कलशेट्टी (गोगाव) हे मयत झाले होते.सदरचा अपघात हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुल्याजवळ झाला होता.त्यामध्ये मयत आरती बिराजदार (चपळगांव), गणपती पाटील (सलगर), अमर कलशेट्टी (गोगाव) यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे. त्याचे वितरण शनिवारी करण्यात आले.वारसादार अंबरनाथ बिराजदार, संजयकुमार पाटील ,महांतेश कलशेट्टी यांनी धनादेश स्वीकारला.वास्तविक पाहता खाजगी ट्रॅव्हल्समध्ये मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधी मिळत नाही परंतु आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे तालुक्याला ही मदत मिळाली आहे,असे चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले.यावेळी अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे, बसवराज बाणेगाव,राजकुमार झिंगाडे,पंडित पाटील ,मनोज इंगोले, सुरेश सुरवसे, चिदानंद हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.