सांगली : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश सुरु असतांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील प्रवेशाचा सोहळा होवू घातला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून २०१४ची निवडणूक लढलेले काँग्रेस नेते सिद्धार्थ जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर आज सिद्धार्थ जाधव आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून सिद्धार्थ जाधव यांनी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस जवळ करणाऱ्या जाधव यांनी ठाकरे गटाचा रस्ता धरला. मात्र, त्याचा काँग्रेसवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल. सिद्धार्थ जाधव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची २०१४ची निवडणूक मिरजमधून लढवली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पुढील २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसची ही जागा राष्ट्रवादी-स्वाभिमानीच्या वाट्याला गेली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे सिद्धार्थ जाधव हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.