ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हि लोकभावना : प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट दिले संकेत !

लातूर : वृत्तसंस्था

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील, यात कुठेही शंका नाही. परंतु २०२४ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप प्रणीत सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, ही भाजप कार्यकर्त्यांची भावना असून त्यात गैर काय? असा सवाल उपस्थित करताना अंतिम निर्णय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्वच घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी लातूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाचे संपर्क ते समर्थन अभियानांतर्गत राज्यभरात सुरू असलेल्या लोकसभा प्रवास योजनेदरम्यान मंगळवारी बावनकुळे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सुपर वॉरियर्सशी संवाद साधत पक्ष संघटन मजबुतीसंदर्भात मार्गदर्शन केले. सकाळी लातूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. २०२४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे विधान काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी केले होते. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी पुढील मुख्यमंत्री अजितदादा पवारच होतील, असा दावा केला होता. या परस्परविरोधी वादातीत विधानांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला जसे अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते, तसे शिवसैनिकांना एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटणे स्वाभाविक आहे. असे असताना भाजप कार्यकर्त्यांना पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे वाटत असेल तर गैर काय? असा सवाल करीत यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत कितपत पोहोचल्या आहेत व भविष्यात सर्व योजनांचा लोकांना लाभ व्हावा, या दृष्टीने तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारच्या योजनांबद्दल लोकांमध्ये समर्थन मिळवण्यासाठी जिल्ह्यात ६०० सुपर वॉरियर्स आणि ६०० स्थानिक नेते साडेतीन लाख लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन संवाद साधतील, असा या अभियानाचा हे तू असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!