सोलापूर : प्रतिनिधी
होटगी रोड विमानतळाच्या मालकीची जागा काही लोकांनी नोटरीवर विक्री केल्याप्रकरणी अखेर महापालिका मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपीक वलीसाब दावलसाब शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहेत.
या प्रकरणाशी निगडित कब्जापावती व करारपत्राची छायांकीत प्रत उपलब्ध करून घेतली असता, उपलब्ध कागदपत्रांनुसार महापालिका मालमत्ता कर विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपीक वलीसाब शेख हे कुलमुखत्यार असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांना १० ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, कारणे दाखवा नोटिशीस वलीसाब शेख यांनी मी कोणताही व्यापार केलेला नाही. १० ऑक्टोबरच्या कारणे दाखवा नोटिशीमध्ये राजमाने बसगी यांच्याशी केलेला वैयक्तिक व्यवहार केलेला आहे. त्यांची माझी अनेक वर्षापासून ओळख आहे. त्यांची कामे वयोमानानुसार व परगावी राहात असल्याने जमत नसल्याने त्यांना त्यांच्या कामात मदत व्हावी म्हणून कुलमुखत्यार पत्र दिले आहे. त्यांनी कुलमुखत्यार पत्र रद्द केले असल्याचा खुलासा १२ ऑक्टोबर अन्वये केला आहे.
भारतीय विमान प्राधिकरण व्यवस्थापक यांनी रेखाबाई हिरेमठ व इतर ६ यांच्या तक्रारी सोबत जोडून, होटगी रोड विमानतळ प्राधिकरणाची संपादित जमिनीचे गट क्र. ७१/१, ७१/२ (प्राधिकरणाची संपादित जमीन परंतु सध्या महाराष्ट्र शासनाचे नावे ७/१२), गट क्र. ७३ व ६४ प्राधिकरणाचे नावे ७/१२ उतारा असलेल्या गटावर अनधिकृतपणे अतिक्रमण झालेले क्षेत्र म्हणजे प्लॉट धारकांची फसवणूक करून अनधिकृतपणे नोटरी करून दिले. फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे अर्ज दाखल करून त्याची प्रत प्राधिकरणाकडे पाठविली असून, तक्रारीतील मुद्दे गंभीर स्वरूपाचे आहेत.