मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात चांगलाच गारठा पडला होता. अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. तर पहाटे आणि रात्री कमालीची थंडी जाणवत होती. त्यांनतर आता पुन्हा राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाल्याने सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उकाडा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. याशिवाय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. यामुळे गारठा काहीसा कमी होत आहे. धुळे वगळता राज्याच्या किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या पुढे गेला आहे. दरम्यान, आजही राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात कमी गारठा जाणवणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात दक्षिणेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच थंडीचा जोर ओसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र गारठला होता. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात थंडीत वाढ झाली होती. मात्र आता पुढील काही दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात पडलेली थंडीची लाट काहीशी ओसरणार आहे.
तर नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाअखेर आणि नववर्षाच्या स्वागताला राज्यात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.