मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून राज्यातील जनतेला प्रतीक्षा असलेल्या निकाल आज लागला आहे. या निकालात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची १९९९ ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही असंही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कुणाची? यावर आधी निर्णय दिला त्यानंतर त्यांनी आपण अपात्रतेवर निर्णय देणार असं म्हटलं होतं. शिवसेनेची घटना, त्यात २०१८ मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काय निकाल दिला तेदेखील मी विचारात घेतलं आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसंच विधिमंडळातलं बहुमत काय आहे? तेदेखील लक्षात घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यासाठी योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या सगळ्या निकषांवर खरी शिवसेना कुणाची? निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.