मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवर गेल्या काही महिन्यापासून कारवाईला सामोरे जावे लागत आहे. यामुद्यावर अनेकदा भाजप व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असून नुकतेच जनता न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला. या पत्रकार परिषदेनंतर भाजपचा जळफळाट झाला आहे. भाजपला भीती वाटायला लागली आहे. त्यामुळेच जनता न्यायालयावरून लक्ष हटवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधानांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता, आता पंतप्रधान माफी मागणार का? किंवा दादा पंतप्रधानावर अब्रू नुकसानीचा दावा करणार का?, असा टोलाही यावेळी लगावला. ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आज ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला असून आमदार राजन साळवी यांच्यावरही बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसत्रानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून भाजप- शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, कुटे ग्रुपचे मालक सुरेश कुटेंवर बीडमध्ये धाड पडली. धाड पडल्यानंतर पाचव्या दिवशी बावनकुळेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यावरील कारवाई थांबली, यावर कोणी का बोलत नाही. भावना गवळी, यशवंत जाधव हे जर निर्दोष असतील तर यातील किती लोकांनी अब्रू नुकसानीचा दावा केला किंवा माफी मागण्याची मागणी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर आदित्य ठाकरेंनी पालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले. ललित पाटील प्रकरणही भाजप दाबून टाकण्याचा प्रयन्त करत आहे. जेव्हा जेव्हा आमच्याकडून मोठी घटना होत्या त्यावेळी भाजप सुडबुद्धीने कारवाई करते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.