मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा सरकार विरोधात लढा सुरु होता आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा २६ जानेवारी मुंबईत दाखल होत आहे. मनोज जरांगे हे त्यांचे समर्थक आणि लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. मराठा समुदाय सध्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये जमला आहे. काही वेळात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होईल. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करतील. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी चर्चेसाठी यावे. आरक्षणाची मागणी मान्य करावी. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही मात्र, आझाद मैदानावरच उपोषण करणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील व्यक्त केला आहे.
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ; दीपक केसरकरांची माहिती
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती शिक्षणंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे समाजाविषयी खूप संवेदनशील आहेत. ते राज्याच्या हिताचा विचार करतील. त्यांच्या मागण्या आता मान्य झाल्या आहेत. त्याची शासकीय अंमलबजावणीदेखील होईल. राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख कुणबी जातप्रमाणपत्रं दिली आहेत. नवीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५० लाखांहून अधिक प्रमाणपत्रं दिली जातील. पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.