ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बापरे : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना विषबाधा !

शहापूर : वृत्तसंस्था

तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारच्या जेवणानंतर एकाचवेळी उलट्या होऊ लागल्याने विषबाधेच्या शक्यतेने शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले, परंतु सायंकाळी साडेपाचपर्यंत एकूण १७० विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात आले. यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शाळेची पटसंख्या ३५० इतकी असून बुधवारी त्यापैकी १७० विद्यार्थी हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भातसई आश्रमशाळेलगतच्या वासिंद गावातील एका कुटुंबाने आश्रमशाळेतील या आदिवासी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेच्या हेतूने बुधवारी दुपारचे जेवण दिले. दुपारच्या सत्रात डाळ, भात, भाजी, गुलाबजाम असे जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, अस्वस्थ वाटू लागले. यातील अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले. त्यानंतर व्यवस्थापनाने शाळेतील शिक्षक व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तत्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या १७० विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!