अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथील एका माजी सैनिकावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गुरुवारी उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण प्रशासनाने अवघ्या तीन तासात सोडविले.त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही महावितरण कार्यालयाने केली.
त्यामुळे माजी सैनिकांनी समाधान व्यक्त केले.माजी सैनिक दत्ता बनसोडे हे भुरीकवठे येथील रहिवासी असून त्यांच्या घरजागेत बेकायदेशीर अतिक्रमण करून एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या विज कनेक्शन घेतले होते. त्यासाठी आज सकाळी माजी सैनिक बनसोडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.या प्रकाराची गंभीर दखल अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्वच माजी सैनिकांनी घेऊन तात्काळ ते घटनास्थळी धावून आले आणि महावितरण कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित राहून माजी सैनिकावर झालेला अन्याय बघून सर्व माजी सैनिकांनी न्याय देण्याची भूमिका घेतली.
या उपोषणाला पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे यांनी संघटनेसोबत चर्चा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.यापुढे देखील तालुक्यातील कुठल्याही माजी सैनिकावर जर अन्याय झाला तर आपली संघटना गप्प बसणार नाही,असा इशारा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी दिला आहे. जागेवरील अतिक्रमण संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून यासंदर्भात उद्या (शुक्रवारी )त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.यावेळी बापूराव सुरवसे,विठ्ठल फडतरे,रामचंद्र शिंदे,परशुराम खडसे,लतीब ठोकळे,दत्ता सुरवसे,मीरा बुद्रुक,नागनाथ कोकरे,चंद्रकांत शिंदे,चंद्रहार क्षीरसागर आदी उपस्थित होते.