ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

नागपूर : वृत्तसंस्था

पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. बुधवारी ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दत्तात्रय महाकुळकर (पोलिस हवालदार) व नितीन पुरुषोत्तम ढबाले (पोलिस शिपाई) अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एका व्यक्तीने पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. पासपोर्ट कार्यालयाकडून पडताळणीसाठी अर्ज हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आला.

पडताळणीच्या सकारात्मक अहवालासाठी दोन्ही आरोपींनी समोरील व्यक्तीला दोन हजारांची लाच मागितली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने समोरील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागातील पथकाने प्राथमिक चौकशी केली व तक्रारींत तथ्य असल्याची बाब समोर आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी २ हजारांची लाच स्वीकारताना नितीन ढबालेला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता राहुल महाकुळकरच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची त्याने कबुली दिली. पथकाने त्यालादेखील ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!