अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील फत्तेसिंह क्रीडांगणावर शुक्रवारी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पादुका दर्शनासाठी अक्कलकोटसह सोलापूर जिल्हा व परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता.मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी सेवा कक्ष, महाप्रसादाची व्यवस्था, दर्शन रांग, देणगी कक्ष यासह विविध कक्ष उभारण्यात आले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.प्रारंभी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्टॅन्ड जवळील खंडोबा मंदिर येथून सिद्ध पादुका पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.बस स्टॅन्ड, विजय चौक, कारंजा चौक, सेंट्रल चौक, फत्तेसिंह चौक, ए-वन चौक मार्गे ही पालखी फत्तेसिंह मैदानावर नेण्यात आली.
त्यानंतर यजमान लक्ष्मण पवार,प्रवीण पाटील,कमलाकर माने यांच्या हस्ते मुख्य पिठावर गुरूपादुका पूजन झाले. या सोहळ्याला आमदार सचिन कल्याणशेट्टी,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, माजी नगरसेवक महेश हिंडोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यानंतर दिवसभर आरती, प्रवचन,उपासक दीक्षा, दर्शन, पुष्प वृष्टी, सामाजिक उपक्रमांतर्गत अॅम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.उपासक दीक्षा देतेवेळी थेट नाणिजधामवरून जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज यांनी भाविकांना ऑनलाइन दर्शन देत मार्गदर्शन केले. यावेळी हजारो भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या ऑनलाइन अमृतवाणीचा लाभ घेतला.प्रत्यक्षात दिवसभर मंडपात प्रवचनकार पार्वती वाघमोडे यांनी अध्यात्मावरती प्रवचन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष शरद मते,जिल्हा सेवा निरीक्षक दादासाहेब मते, महिला जिल्हाध्यक्ष सविता परांडे,तालुकाध्यक्ष लक्ष्मण पवार, महिला तालुकाध्यक्ष विद्या चव्हाण आदींसह मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेकडून दरवर्षी अनेक लोक उपयोगी उपक्रम राबविले जातात.गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य दिले जातात.संस्थेच्यावतीने ५२ अॅम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीजधाम येथे २४ तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खाते औषधे ,शेती, अवजारे वाटप केली जातात. दुष्काळ पडल्यास संस्थांच्यावतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम अंतर्गत अंगार,दोरे यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जाते.दुर्बल घटक मदत उपक्रम निराधार महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, शेळ्या, मेंढ्या, दूपत्या गाई व म्हशीचे वाटप केले जाते,असे जिल्हाध्यक्ष मते यांनी सांगितले.