पुणे : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता वातावरण तापायला लागले आहे. सध्या शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमोक कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार हे शिरुर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.
शिरुर तालुक्यात पुढील काळात राष्ट्रवादीमय वातावरण होईल असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी सभेत बोलताना थेट खासदार कोल्हेंवर निशाणा साधला. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिले. पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असे अजित पवार म्हणाले.
तसेच “राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन ही निवडून आले अन मग राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली,” असे कोल्हे म्हणाल्याचे सांगत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
“लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करतायेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा, असे म्हणत लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या,” असे आवाहनही अजित पवार यांनी केले.