पंढरपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. नुकतेच शरद पवारांनी एका आमदाराला दम दिल्यानंतर पंढरपूरमधून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील भूमिका मांडली आहे.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले कि, शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक असावा, असे विधान त्यांनी केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ”शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक असावा. अजितदादांच्या भूमिकेमुळे शरद पवार रागावले असतील मात्र अजित पवारांनीच भूमिका योग्य आहे, ” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, ”आज देशाचे राजकारण, देशाचे विकास ज्या दिशेने जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आज अनेक देश मानत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळेच देशात सुरू असलेले विकासाचे पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींनी मिळवलेला दबदबा हे लक्षात घेता आणि याचा विचार करून शरद पवारांनी राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती”, असे मत देखील शहाजीबापू यांनी व्यक्त केले आहे. तसेच माढा लोकसभेत सध्या प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरत आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेले असेल. माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मागत आहेत. पण ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील”, असा विश्वासही शहाजीबापू यांनी व्यक्त केला .