बीड: वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या कार्यकत्यांवर द्वेष भावनेतून गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. मलाही यात गुंतवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सगेसोयरे कायद्याच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेणारच आहोत, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. गेवराई शहरात रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
महोत्सवाचे उद्घाटन जरांगे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे जेसीबी चालकांना जाणीवपूर्वक ताब्यात घेण्यात आले आहे. माझ्यावर जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव होऊ नये म्हणून, तसेच द्वेष भावनेतून लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. समाजाची राज्यातील सर्वांत मोठी सभा बीड शहरात घेण्याचे नियोजन सुरू आहे. राजकारण माझा मार्ग नाही. परंतु याचा फटका सरकारला नक्कीच बसणार, तसेच सरकारने सगेसोयरे अंमलबजावणीसह निश्चित केलेल्या सहा मुद्द्यांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.