पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील पुणे शहरात मनसेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता नुकतेच वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टमुळे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत. राज ठाकरे यांनी पुणे शहराकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छूक आहे. दोघांनी निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाकडे आणि जाहीररित्या व्यक्त केली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनीही आपली तयारी सुरू केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच आता त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.
वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये ते म्हणतात की, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. वसंत मोरे हे त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांना वेगळा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर शहरामध्ये मनसेची वाढ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे.