ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार गटाला बसणार धक्का : लंके करणार पक्षप्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरु असतानाच, आता नीलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

दरम्यान नीलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती. त्यानंतर नीलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु नीलेश लंके यांनी नकार दिला होता. आता शरद पवार यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. नीलेश लंके यांचे ‘मी अनुभवलेले कोव्हीड’ या पुस्तकाचे प्रकाशन आज होणार आहे. हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवणुकीपूर्वी डॉ. विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली होती. त्यांनी या मतदारसंघातून विजयही मिळविला. त्यामुळे यावेळीही तेच उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. मात्र, भाजपमधून प्रा. राम शिंदे, प्रा. भानुदास बेरड यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. भाजपने विखे यांचीच उमेदवारी जाहीर केली आहे.

नीलेश लंके हे विखेंचे प्रबळ विरोधक मानले जातात. त्यामुळे महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जाते. दरम्यान, शिंदे, बेरड यांनी भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली होती. त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत. आमदार नीलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काल भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.आज प्रवेशासोबतच त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!