मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतून अजित पवार आपल्या आमदारांसह बाहेर पडल्यानंतर मोठ बंड झाले होते. त्यानंतर आता आगामी काळात लोकसभा निवडणूक लागत आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची छायाचित्रे प्रचार साहित्यात का वापरत आहात? असा सवाल केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करणार नाही, असे हमीपत्र दाखल करण्याचे आदेश देखील न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत.
तुम्ही शरद पवार यांची छायाचित्रे का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर तुम्ही तुमची छायाचित्रे वापरा, अशा शब्दात न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले आहे. “आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही त्याचे नाव, फोटो इत्यादी वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयावरही शरद पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना नवीन चिन्ह वाटप करायला हवे होते. आमच्याकडे नवीन चिन्ह आहे त्यांना मात्र, घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरू द्या. घड्याळ या चिन्हाची ओळख शरद पवार यांच्याशी अतूटपणे जोडलेली असल्याचे शरद पवार यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत न्यायपीठाने अजित पवार गटाने शरद पवार यांचा फोटो वापरु नये अशी सूचना केली.
तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवार यांच्यासोबत राहायचे नाही, असा निर्णय तुम्ही घेतला आहे. मग त्यांचा फोटो तुम्ही प्रचारासाठी का वापरतात? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारला आहे. इतकेच नाही तर आता स्वतःची ओळख निर्माण करा. निवडणूक चिन्ह म्हणून दुसरे एखादे चिन्ह वापरा, आणि त्या नव्या विचारधारे आधारे निवडणूक लढा, अशा सूचना देखील न्यायालयाने अजित पवार गटाला केल्या आहेत.