ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदींनी केले आवाहन : विजयाचे सर्व विक्रम मोडणार !

लखनौ : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपल्या बुथवरील जुने सर्व विक्रम मोडित काढण्याचा संकल्प करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह बघून इतर पक्षांचे नेते आत्ताच थंड पडले आहेत, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी बुधवारी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांसोबत ‘नमो अॅप’ च्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मोदींनी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. निवडणुकीच्या विजयाचा आत्मा पोलिंग बूथमध्ये असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी पोलिंग बूथवरील जुने विक्रम मोडण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मोदी म्हणाले. त्यांना कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करण्याचाही सल्ला दिला. पोलिंग बूथच्या लाभार्थ्यांच्या रिल्स बनवा. तुमचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू द्या, असे पंतप्रधान म्हणाले.

भाजप कार्यकर्ते हा पक्षाचा चेहरा आहे. तुम्ही लोकांना भेटता तेव्हा ते तुमच्यामध्ये मोदीला बघतात. मतदार तुमचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे तुम्हाला अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. या वेळी मोदींनी विरोधकांवरही टीका केली. ही निवडणूक लोकशाहीचे कल्याण विरुद्ध घराणेशाहीचे राजकारण, भ्रष्टाचार यांच्यात आहे. या निवडणुकीत सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. मात्र, मी भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणे बंद करणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!