मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे. मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. चंद्रपूरनंतर रामटेक मध्ये देखील 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभांनी पूर्ण विदर्भातील वातावरण ढवळून निघेल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत गेल्या काळामध्ये चर्चा झालेल्या आहेत. विशेषता जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा मनसेने हाती घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मधल्या काळात जरी त्यांची वेगळी भूमिका असली तरी देखील आज त्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला असल्याचे मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव भारताची निर्मिती केली आहे .अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी आमचे भूमिका आहे. ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम ही, भूमिका महत्त्वाची आहे, त्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे, असे मला वाटते. त्यामुळे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.