अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सव ६ मे रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सकाळी १०:३० वाजता वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजनसेवा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले.
प्रारंभी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभपर्व आरंभी वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वा.श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला. आज गुढी पाडव्यानिमीत्त वटवृक्ष मंदिरातील मुळ गाभाऱ्यातील श्रींच्या मुर्तीस सुवर्ण टोप व सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले आहे. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन इंगळे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हजारो स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नववर्षानिमित्त नवनवीन संकल्प स्वामींच्या चरणी अर्पण केले. सर्व स्वामी भक्तांचे संकल्प सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. सर्व स्वामी भक्तांच्या मनोकामना व संकल्प पूर्णत्वास जावे हीच स्वामी समर्थांच्या चरणी शुभकामना व्यक्त करून सर्वांना गुढीपाडव्याच्या व नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, ओंकार भिमपूरे, ज्ञानेश्वर भोसले,उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, ओंकार पाठक, मनोहर देगांवकर, शिवशंकर बिंदगे, प्रसाद पाटील, ज्योती जरीटके, राजू गव्हाणकर, दीपक जरीपटके, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी,अक्षय सरदेशमुख, मोहन शिंदे, संतोष पराणे,सागर गोंडाळ,विपूल जाधव,संतोष जमगे, जयप्रकाश तोळणूरे, श्रीकांत मलवे, रवि मलवे, संजय पवार आदींसह भाविक उपस्थित होते.