---Advertisement---

…म्हणून सत्तेचा टांगा पलटी करावा लागला ; मुख्यमंत्री शिंदे

By team
On: April 14, 2024 3:54 PM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

सन 2019 मध्ये विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली, जनतेविरोधात त्यांनी सत्ता स्थापन केली, पण आम्हाला त्यांचा टांगा पलटी करावा लागला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नांदेडमध्ये हल्लाबोल केला.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्हयातील हदगावमध्ये आले होते. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, अभिनेते गोविंदा, आमदार भीमराव केराम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विरोधक आमचे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणत असताना उलट अजित पवार आमच्यात सहभागी झाले. आता मनसे देखील महायुतीमध्ये आल्याने आणखीनच सरकार मजबूत झाले आहे. त्यामुळे त्यांचा ज्योतिषी कच्चा निघाला, असं म्हणत त्यांनी दीड वर्षात राबवलेल्या कामांचा पाढा वाचला. पोलीस भरतीसाठी मुदत वाढ देण्यात आली असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेलेल्यांना स्थगिती मिळाली नाही. कारण हे आरक्षण टिकण्यासाठी आमच्याकडे डेटा आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पूर्वीचे सरकार अहंकारी होते. केंद्राकडे मदत मागायची म्हटले तर, त्यांचा अहंकार आडवा येत होता. पण, घरी आणून कोणी देत नसतं. आम्ही दिल्लीत वारंवार महाराष्ट्रासाठीच जातो. त्यांच्याकडे कोणता अजेंडा आणि झेंडा पण नाही. कमिशन आणि करप्शन, अशी त्यांची निती आहे. तर, आपल्याकडे नेशन फस्ट अर्थात राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ही निवडणूक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लिटमस टेस्ट असणार असल्याचेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!