---Advertisement---

बावनकुळेंचा हल्लाबोल : पवारांचा शपथनामा म्हणजे सर्वात मोठी फसवणूक

By team
On: April 25, 2024 4:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच शरद पवारांचा शपथनामा म्हणजे जगातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे. यावरून बावनकुळे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली होती. गेल्या दहा वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत आत्महत्या थांबवण्यासाठी काय काम केले हे अमित शहांनी सांगावे” असा सवाल पवारांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ”शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे”, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

पुढे बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ”1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. 1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1988 मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1999 मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. 2019 मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?” अशा अनेक घटनांचे दाखले देत बावनकुळे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!