मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून शपथनामा म्हणजेच जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या शपथनाम्यात महिला, आदिवासी, शिक्षण, विद्यार्थी, पर्यावरण अशा घटकांवर भर देण्यात आला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती ५०० रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असून, यासाठी सबसिडी देण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक आघाडीचे मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी, सरकारी रिक्त जागांवर भरती, महिलांना ५० टक्के आरक्षण, जीएसटीचे योग्य नियमन, कराबाबत राज्यांना अधिकार, अॅप्रेंटिसमध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ष विद्यावेतन, स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ, मुलींच्या शिक्षणातील अडचणी दूर, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती, सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धती बंद, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची ५० टक्क्यांची अट दूर करू, आदिवासींच्या वनाधिकाराची जपणूक, अर्थसंकल्पात शिक्षणावर सहा टक्के तरतूद करणार आहोत. किमान वेतन ४०० रुपये प्रतिदिन केले जाईल. अंगणवाडी सेविकांची संख्या वाढवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.