पुणे : वृत्तसंस्था
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांसाठी शनिवारपर्यंत राज्यभरातून केवळ ४३ हजार पालकांनी अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपत आहे. जास्तीत जास्त अर्जनोंदणी व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरात आरटीईच्या ८ लाख ८६ हजार ४११ इतक्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. परंतु, केवळ ४३ हजार पालकांनीच अर्जनोंदणी केल्याची आकडेवारी आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा शासनाने आरटीई कायद्यात बदल करत शासकीय आणि खासगी अशा सर्व शाळांमध्ये प्रवेशाची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित, शासकीय यांसह खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाची तरतूद करण्यात आली. त्यामुळे अर्जनोंदणी वेगाने होणे अपेक्षित असताना पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन अर्ज करताना खासगी शाळांचा पर्याय उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. तसेच बहुतांश शाळा या चौथी आणि पाचवीपर्यंतच्या असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्यायदेखील दिसत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या कारणांचा परिणाम आरटीईच्या अर्जनोंदणीवर झाला असल्याचे मानले जात आहे. राज्यात पुण्यातून आरटीई अर्जाची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, नाशिक येथून अर्जाचे प्रमाण जास्त आहे. मुंबईसारख्या महानगरामध्ये आरटीईला संथ प्रतिसाद असल्याचे दिसून आले.