कोल्हापूर : वृत्तसंस्था
देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक पंतप्रधान जवळून पाहिले. पंतप्रधानांसारख्या व्यक्तीसाठी देशातील सर्व भाग एकसारखेच असतात. उत्तर-दक्षिण असा वैचारिक भेद करणे अयोग्य आहे. सध्या नरेंद्र मोदींच्या काळात पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा झाली आहे, असा घणाघात माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर कोल्हापुरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच मोदी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. याचे कारण सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात कमी जागा येतील, अशी भीती वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले,नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर अतृप्त आत्मा अशी टीका केली आहे; पण त्यांच्या काळात पंतप्रधानपदाची पत कमी राखली गेली. मागील निवडणुकीमध्ये युतीला राज्यात भरपूर जागा मिळाल्या होत्या; पण सध्या मात्र असे चित्र राहिलेले नाही. मोदी सरकारवर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या जागा घटतील, असे चित्र आहे. म्हणूनच मोदी सतत महाराष्ट्रात सभा घेत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या दोन टप्प्यांबाबत आम्ही २-० ने आघाडीवर असल्याचे विधान केले, त्यावर पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडे बोलण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच ही मंडळी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशी विधाने करत आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकर येतात म्हणजे ती त्यांची स्टाईलच आहे. ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास ५ पंतप्रधान होतील, असे वक्तव्य मोदींनी केले आहे, ते धादांत खोटे आहे.