मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना नुकतेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्याने राज्यात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याशी थेट संबंध त्यांच्याच पक्षासोबत लावला जात आहे. त्यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असल्यानेच त्यांनी अशा प्रकारची भूमिका मांडली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. या संदर्भात राज्यातील अनेक नेत्यांनी आपले मत मांडले आहेत.
पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही… वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मात्र, हे शरद पवार यांचे जनरल स्टेटमेंट आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला आहे.