धुळे : वृत्तसंस्था
काळे धन विदेशातून परत आणू, दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, अशा अनेक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या; परंतु त्याची अंमलबजावणी अजिबात केली नाही. मोदी खोटे बोलून सत्तेत आले, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी येथे केली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी खरगे यांची जाहीर सभा किसान महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार बापू चौरे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, माजी आमदार अनिल गोटे, रामकृष्ण पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. खरगे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली.
ते म्हणाले की, ही निवडणूक देशात परिवर्तन घडविणार आहे. मोदी, शाह यांना मते दिली तर पुढची पिढी गुलामगिरीत जाऊ शकेल, असा इशाराही त्यांनी दिला. भारतीय जनता पक्षातर्फे संविधान बदलविण्यासाठीच ४०० पारचा नारा देण्यात आहे; परंतु संविधान बदलवू न देण्याची जबाबदारी आपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, तुम्ही पिकविलेल्या कापसाचा कापड ते घालतात; पण ते खोटे बोलतात. ते विदेशी कपडे घालतात. कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, असेही ते म्हणाले. शेवटी ‘मोदी हटाव, देश बचाव’ असा नारा देत त्यांनी भाषण संपविले.