मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याने निकालानंतर शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची चर्चा जोरदार सुरू झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना देखील नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच कारवाईचा धोका टाळण्यासाठी त्या दोन खासदारांनी योजनाही आखली आहे असे म्हस्के म्हणाले.
एकीकडे लोकसभेत महायुतीला अपयश आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून महायुतीतील आमदार, खासदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता नरेश म्हस्के यांच्या दाव्याने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आज प्रसार माध्यमांशी बोलतांना नरेश म्हस्के यांनी हा मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे”, असे म्हस्के म्हणाले.
म्हस्के पुढे म्हणाले की, ”मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे आहे”, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.