पुणे : वृत्तसंस्था
राज्यात भाजपला मोठा धक्का बसल्याने राज्यात महाविकास आघाडीची जोरदार चर्चा सुरू असताना नुकतेच शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
खा.सुळे म्हणाल्या की, दिल्लीतून मला बातमी आलीय. RSS ला नेतृत्व बदल पाहिजे आहे असे मोठे विधान त्यांनी केले आहे. तर त्यांच्या या विधानावर मंत्री गिरीश महाजन यांनीही पलटवार केला आहे. सुप्रियाताईंना कोणी बातमी दिलीय हे माहिती नाही. मात्र ही बातमी खोटी आहे असे महाजन म्हणालेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुण्यातील एका सभेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”एका कार्यकर्त्याने मला माहिती दिली आहे की आरएसएसने निर्णय घेतला आहे. त्यांना नेतृत्त्वबदल हवा आहे. या माहितीबाबत खरंखोटं मला माहीत नाही. तुम्ही नेतृत्त्वबदल करा नाहीतर नका करू. पण प्रशासनाला बसा. नाहीतर झेपत नसेल तर हम तो तय्यार है. आज देशात जे चित्र झाले आहे आपल्यासाठी फार आशादायी आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
यावर मंत्री गिरीश महाजन मात्र यांनी सुप्रिया सुळे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, ”सुप्रियाताईंना कोणी बातमी दिलीय हे माहिती नाही. आरएसएसची बातमी त्यांच्याकडे कशी जाते माहीत नाही. ही खोटी बातमी आहे. काहीतरी सांगयचे, बोलायचे म्हणून त्या बोलत आहेत”, असे ते म्हणाले.