नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकत बहुमत मिळविणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे पार पडला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेतली.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपप्रणीत एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त केले. त्यानंतर झालेल्या एनडीए संसदीय नेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार रविवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडला. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींचे आगमन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
ज्येष्ठतेनुसार प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्रिपदासाठी पात्र होते. शिंदेसेनेचे सात खासदार असताना प्रताप जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद दिले. एकच खासदार असलेल्या अजित पवार गटाला कॅबिनेटपद दिल्यास नाराजीची शक्यता होती. त्यामुळे पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.