ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांचे जनतेला आवाहन : आता तुमची साथ लागणार !

पुणे : वृत्तसंस्था

सहसा सर्वसामान्य लोक पुढे येण्यास धजावत नाहीत. पण निवडणुकीत बटन दाबून बदल मात्र नक्की करतात. लोकशाही टिकवण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्येच आहे, हे झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेतही बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी तुमची साथ लागणार असल्याचे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.

सुपे येथील पूजा गार्डन येथे झालेल्या जनसंवाद दौऱ्याच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विकास लवांडे, तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, वनिता बनकर, पोपट पानसरे, हनुमंत चांदगुडे, ऋषिकेश गाडेकर, अश्विन कुतवळ, सचिन लडकत, जाकिर शेख, महादेव भोंडवे आदींसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, कारखेल, देऊळगाव रसाळ, कोळोली आणि नारोळी यामार्गे आलो असता त्यांनी बंद पाइपलाइनमधून पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे. कालव्याद्वारे पाणी आले, तर शिवारात खेळते. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. जनाई योजना मीच आणली. त्यामुळे राहिलेल्या चाऱ्या पोटचाऱ्यांची अपूर्ण कामे मीच पूर्ण करणार आहे. सुपे व परिसरातून दुधाचे दररोज सुमारे ३० हजार लिटर संकलन होत आहे. त्यामुळे दुधावर प्रक्रिया करणारे तीन कारखाने येथे आणले. त्यामुळे दोन ते तीन तालुक्यांतील १२ लाख लिटर दुधावर प्रक्रिया होत आहे. दुधाचा जोडधंदा प्रपंच चालवण्याकरिता उपयुक्त असल्याने प्रतिलिटर पाच रुपये दर वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र सरकारने निर्णय घेतला, पण पैसे मिळाले नाहीत. यापुढे दुधाची रक्कम वाढवून घेण्याची मागणी करावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. या भागात कांद्याचे पीक जास्त प्रमाणात असते. मात्र, केंद्र सरकारने राज्यातील कांद्यावर ४० रुपये निर्यात शुल्क आकारले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात थांबली. येथील कांद्याला बाजारभाव मिळू शकला नाही. तर कर्नाटक, गुजरातच्या कांद्यावर कर आकारला नाही. त्यामुळे येथील सरकार येत्या चार महिन्यांत घालवायचे असून, कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. लोकसभेप्रमाणे राज्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. तरच आपली कामे मार्गी लागतील, असे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!