बारामती : वृत्तसंस्था
खासदार सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना वरील खंत व्यक्त केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात. खरेतर सातारची जागाही निवडून आली असती, पण पिपाणीने घोळ केल्यामुळे ती थोडक्यात हातून निसटली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केली.
यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे जनतेने आमच्यावर टाकलेली मोठी जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील जनतेने ज्या प्रकारे महाविकास आघाडीवर विश्वास टाकला. या माध्यमातून त्यांनी आमच्यावर प्रचंड जबाबदारी टाकली. त्यांचा विश्वास व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी संघर्ष हा शरद पवारांच्या रक्तातच असल्याचा दावाही केला. शरद पवारांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यांचा एका आव्हानानंतर दुसऱ्या आव्हानांचा सामना करण्याचा स्वभाव आहे. त्यात त्यांना मजाही येते. संघर्ष हा त्यांच्या रक्तात व स्वभावात आहे, असे त्या म्हणाल्या.
सुळे म्हणाल्या, लाेकशाहीत प्रत्येकाला काेणासाेबत रहावयाचे याचा अधिकार आहे. बारामतीकरांनी यंदा अमच्यावर मतांचा पाऊस पाडला. निवडणुकीत नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा नवीन बदल करुन डेटावर काम करा असे सांगितले जाते. नवीन पंडित येतात राजकारणात पण राजकारणाची सर्व सुत्रे लाेकांच्या मनात असतात. या निवडणुकीत वेगवेगळे अनुभव आले. यंदा निवडून आल्यावर मला संधीचे दडपण आले. ज्याप्रकारे यंदाची निवडणूक झाली, त्यानुसार लाेकांनी विश्वास टाकल्याने जबाबदारी वाढली आहे, असे त्या म्हणाल्या.