मुंबई : वृत्तसंस्था
देशातील सर्वच विरोधक सरकारला घेरण्यासाठी अनेक योजना करीत असता नुकतेच राज्यातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पक्षाने तयार केलेल्या अधिकृत ईमेलवर जनतेचे प्रश्न पाठवा असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी ‘चांदा ते बांदा’ पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विजयासाठी पुन्हा एकदा आभा मानले आहेत.
https://x.com/supriya_sule/status/1805444002906522033
सुप्रिया सुळे यांचे ट्विट काय?
”नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी विक्रमी यश संपादन केले याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आपण सर्वांनी या निवडणूकीत पक्षाची विचारधारा आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा दिला. आपण या निवडणूकीत केलेले काम मोलाचे आहे, याबद्दल पक्षाची कार्याध्यक्ष म्हणून मी आपले मनापासून आभार मानते. आपण मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांचा सन्मान तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी या संघर्षात सर्वस्व विसरुन सहभागी झाला. आपल्या सहभागामुळे आदरणीय पवार साहेबांनी सुरु केलेल्या या लढाईला बघता बघता एका लोकसंग्रामाचे रुप प्राप्त झाले. यामुळेच संसदेत आपले आठ खासदार आपणा सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण पाठविले. आपण सर्वांनी मिळून केलेल्या या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे.
आपल्या सर्वांच्या साथीने पक्षपातळीवर एका संकल्पनेची सुरुवात करण्याचा माझा विचार आहे. आपणास माहितच आहे की, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी ‘चांदा ते बांदा’ पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे.
आपल्या माध्यमातून संसदेत निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार जनहिताचे प्रश्न संसदेत मांडतील याची मला खात्री आहे. यासाठी मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. सत्ताधाऱ्यांना जनहिताचे प्रश्न विचारण्यासाठी प्रत्येक सेलच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी प्रत्येक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाने अधिकृतरित्या तयार केलेल्या [email protected] या ईमेल आयडीवर घडलेल्या घटनांचा सारांश आणि त्याचे प्रमुख पुरावे (कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ, ऑडीओ, इतर.) जोडून पाठवावे ही विनंती.
या संकल्पनेच्या माध्यमातून संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यास तुमचा हातभार लागेल. पक्षाची ताकद, जनतेचा विश्वास आणि आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल याचा मला ठाम विश्वास आहे. पक्षाच्या या बहुमोल कामगिरीत तुम्हा सर्वांचा निश्चितच सक्रिय सहभाग राहील याचा मला ठाम विश्वास आहे.
अशा आशयाचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.