---Advertisement---

आदित्य ठाकरेंनी लिहले पत्र : शिंदे सरकारवर हल्लाबोल

By team
On: June 26, 2024 9:42 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये गेल्या काही महिन्यापासून विविध विषयावर हमरी तुमरी सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील बेस्ट सेवेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बेस्ट बससेवा बंद करुन ही सेवा त्यांचा मित्र असलेल्या खासगी कंत्राटदाराला देण्याचा डाव असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

लाखो मुंबईकरांना दरोरोज इच्छित स्थळी पोहोचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा अशी ‘बेस्ट’ची ओळख होती. तिच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ‘बेस्ट’ बस सेवेला आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे, अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा…

प्रति,
श्री. भूषण गगराणी जी,
माननीय महापालिका आयुक्त,
मुंबई महानगरपालिका, मुंबई.
विषय- मुंबईची जीवनवाहिनी ‘बेस्ट बससेवा’.
मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली ‘बेस्ट’ बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेले आर्थिक सहाय्य करायला मुंबई महानगरपालिकेने नकार दिल्याचे समजले. लाखो मुंबईकरांना दरोरोज इच्छित स्थळी पोहोचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा अशी ‘बेस्ट’ची ओळख होती. तिच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले ह्याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे.
परंतु गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईच्या या बससेवेकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असे जाणवले. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होणार आहे. जर मुंबई महानगरपालिका MMRDA सारख्या संस्थेला आर्थिक सहाय्य करु शकते, तर ‘बेस्ट’ बस सेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे! ह्याबाबत आमच्या आपणासमोर काही मागण्या आहेत, ज्यांचा तातडीने आणि गांभीर्याने विचार केला जावा.
1. बेस्ट सेवेला मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य करावे.
2. बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये.
3. बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत रहावी, तारिख चुकवली जाऊ नये.
4. बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीने आमलात आणली जावी.
वरील सर्व मागण्या ह्या मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून मी आपणासमोर ठेवत आहे. मुंबईकरांसाठी महत्वाच्या असलेल्या ‘बेस्ट’ बससेवेचे खच्चीकरण केले जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मिंधे राजवटीचा ‘बेस्ट’ बससेवा संपवून त्यांच्या कुठल्या कंत्राटदार मित्रांच्या खासगी सेवेला चालना देण्याचा डाव नसेल, तर आपण ह्या वरील सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराल आणि मुंबईकरांची ‘बेस्ट’ संकटातून बाहेर काढाल, अशी आशा आहे.
आपला विश्वासू,
आदित्य रश्मी उद्धव ठाकरे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!