पुणे : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो होत असल्याची बातमी बाहेर पडत असताना, याच वेळी या धरणाच्या पाण्यात 5 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुडालेल्यांमध्ये 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे. यातील महिला आणि एका 13 वर्षीय मुलीचा मृतदेह बचाव पथकाला मिळून आला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील हडपसर येथील सैद नगर मधील अन्सारी कुटुंबातील काहीजण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्याठिकाणी गेले. दुपारी 12.30 वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण 7 जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र, दुर्दैवाने 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिला पाण्यातून बाहेर पडण्यात अपयशी ठरले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले. शिवदुर्गच्या पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले. मात्र, वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे या बचाव कार्यात अडचणी येत आहे. साधारण पहिल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर शोध पथकाला शाहीस्ता अन्सारी (वय 25) ही महिला आणि अमिमा अन्सारी (वय 13) या मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अन्य तिघांचे शोधकार्य उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते.